कोल्हापूर, २६ ऑगस्ट। कळंबा जेल परिसरातील एका घरात पाईपलाईन मधून आलेल्या गॅसचा स्फोट झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले तसेच घरातील फर्निचर आणि प्रापंचिक जळून खाक झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सुमारे शहरातील गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू आहे. मध्यरात्री येथील शितल भोजने यांच्या घरामध्ये सुरू असलेल्या गॅसमधून अचानक स्फोट झाला. यामध्ये त्यांच्यासह एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले. घरामधील साहित्य जळून नुकसान झाले आहे.
स्फोट झाल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्या. घरातील सोफासेट, फर्निचरही जळाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. स्थानक प्रमुख जयवंत देशमुख यांच्यासह पथकाने आग विझवली. या आगीत जखमी झालेल्या भोजने कुटुंबातील चौघांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या जखमी असलेल्या कुटुंबियांची स्थिती स्थिर असल्याचे वैद्यकीय स्त्रोतांनी सांगितले आहे. पोलिस आणि अग्निशमन विभाग या घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी तपास करीत आहेत. प्राथमिक तपासानुसार गॅस लीकमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता आहे.