ठाणे, 6 एप्रिल (हिं.स.)। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरलेल्या ठाणे पुर्वेकडील कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सवात अवधी पंढरी अवतरली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहु, आळंदी येथुन ३५० हुन अधिक किर्तनकार आणि वारकरी मंडळी ठाण्यात आली होती. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने उपस्थित तमाम वारकऱ्यांचे सन्मानपूर्वक आदरतिथ्य करण्यात आले तर वारकऱ्यांनीही ” आनंदाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
ठाणे पूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे माँतेचा चैत्र नवरात्रौत्सव ०७ एप्रिलपर्यंत सुरू आहे. दररोज या चैत्र नवरात्र उत्सवाला मान्यवर भेटी देत असतात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे राम रेपाळे, हणमंत जगदाळे, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, एकनाथ भोईर, देवगडच्या नगराध्यक्षा स्वाती प्रभू, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, आळंदी येथील ज्येष्ठ किर्तनकार पांडुरंग घुले महाराज, किशोर महाराज, अक्षय महाराज, संदीप महाराज, मनमोहन महाराज, महानुभावचे आचार्य राणा महाराज, आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रभंजन महातोले, वैदीक परंपरेचे सदाशिव गुरुजी, बाळासाहेब महाराज आदीनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी श्री अंबे मॉतेच्या चरणी लीन होण्यासाठी खास देहु,आळंदीहून आलेले तब्बल ३५० हुन अधिक किर्तनकार – वारकरी शुक्रवारी उत्सवात सहभागी झाले होते. जणु काही कोपरीत अवधी पंढरी अवतरल्याचे दिसत होते. याप्रसंगी, लाडके माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या सहकार्याचा तसेच अभुतपूर्व योगदानाचा आवर्जून उल्लेख करून उपस्थित समस्त वारकऱ्यांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी रंगमंचावर सादर केलेल्या “मी डोलकर ” या मराठी कोळीगीतांच्या सुमधुर मैफिलीवर महिला वर्गाने फेर धरीत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
वारकऱ्यांनी ठरवले अन केला करेक्ट कार्यक्रम
समाजाला दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असतात. एक पिढी घडवणारा, देश घडवणारा हा संप्रदाय आहे. समाजाला यांची गरज आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वारकऱ्यांनी ठरवले आणि करेक्ट कार्यक्रम करून टाकला. ज्याच्या पाठीशी वारकरी तो यशाचे शिखरे पार करी… अशी स्तुतीसुमने उधळून एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणुन नाही तर मी एक वारकरी म्हणुन उभा असल्याचे स्पष्ट केले. समाजासाठी काय केले हे सांगणार नाही, तर यापुढे जे जे काही करायचे ते करीतच राहणार असल्याची ग्वाही देताना प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वानी योगदान देण्याचे आवाहन केले.