सिंधुदुर्ग, 9 ऑगस्ट : गेल्या वर्षीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुडाळ पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही गटांच्या रिक्षा रॅलीवर निर्बंध घातले होते. मात्र हे निर्बंध नंतर शिथिल करण्यात आले. ठरवलेल्या वेगवेगळ्या वेळेत रॅली सुरू झाल्या असल्या तरी कुडाळ एसटी डेपो जवळ त्या एकत्र आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांचे योग्य नियोजन आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा समजूतदारपणा यामुळे रॅली शांततेत पार पडली.
नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढण्याची परंपरा कुडाळमध्ये आहे. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या वादामुळे पोलिसांनी यावर्षी प्रत्येक गटाला फक्त एक रिक्षा घेऊन रॅली काढण्याचा सल्ला दिला. शिवसेना (उबाठा गट) यांनी तो मान्य केला, परंतु शिवसेना (शिंदे गट) यांनी रॅलीचा आग्रह धरला. अखेर सणाच्या आदल्या दिवशी निर्बंध हटवून दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या.
सायंकाळी ४ वाजता शिंदे गटाची रॅली महायुती कार्यालयातून सुरू होऊन एसटी डेपोवर थांबली. सायंकाळी ५ वाजता उबाठा गटाची रॅली त्याच मार्गावरून येऊन एसटी डेपो जवळ थांबली. दोन्ही गट एकमेकांच्या जवळ आल्यानंतर घोषणाबाजी झाली, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. शेवटी दोन्ही गटांनी नदीकाठी नारळ अर्पण करून रॅली विसर्जित केल्या.