सिंधुदुर्ग, 9 ऑगस्ट : आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत आज कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) बरोबरच भाजप पदाधिकारीही उत्साहाने सहभागी झाले. आमदारांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. पोलिसांनी या रॅलीसाठी कडक बंदोबस्त ठेवला होता.
नारळी पौर्णिमा उत्सव हा कुडाळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि रिक्षा रॅली हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आजच्या रॅलीत महायुती कार्यालयातून सुरुवात होऊन भंगसाळ नदीकाठी नारळ अर्पण करण्यात आला. रॅलीतील दोन रिक्षा विशेष सजविण्यात आल्या होत्या. पहिल्या रिक्षेवर हंड्यात मानाचे श्रीफळ ठेवले होते आणि प्रत्येक रिक्षेवर शिवसेनेचा भगवा धनुष्यबाण फडकत होता.
गेल्या वर्षी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी सुरुवातीला रॅलीवर निर्बंध घातले होते. मात्र गुरुवारी ते उठवून शिंदे गटाला सायंकाळी ४ वाजताची वेळ देण्यात आली. रॅली महायुती कार्यालयातून निघून बाजारपेठ, पानबाजार, गुलमोहोर हॉटेलमार्गे एसटी डेपोकडे गेली. आमदार येईपर्यंत सर्व रिक्षा डेपोजवळ थांबल्या होत्या. तोपर्यंत उबाठा गटाची रॅली समोरून गेली आणि घोषणाबाजी झाली, परंतु पोलिसांच्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
शेवटी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीत मानाचे श्रीफळ विसर्जित करण्यात आले. या वेळी संजय आंग्रे, दत्ता सामंत, विनायक राणे, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, विलास कुडाळकर, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.