जम्मू, 11 ऑगस्ट –
जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल जंगल परिसरात सुरू असलेली दहशतवादविरोधी मोहीम सोमवारी 11व्या दिवशीही सुरू आहे. दहशतवादी घनदाट जंगल आणि नैसर्गिक गुफांचा आडोसा घेऊन लपल्याने सुरक्षा दलांनी घेराबंदी आणखी कडक केली आहे, जेणेकरून ते गोळीबार करत पळून जाऊ शकणार नाहीत.
ही कारवाई आतापर्यंतच्या सर्वांत लांब चाललेल्या मोहिमांपैकी एक मानली जात आहे. सुरुवातीला दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर आतापर्यंत दोन जवान शहीद आणि 9 जवान जखमी झाले आहेत. गुप्तचर माहितीनुसार, जंगलात तीन ठिकाणी सुमारे 8 दहशतवादी लपलेले असून, दिवसाढवळ्या गोळीबार टाळून रात्री पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर सुरू आहे. पॅरा कमांडोही मोहिमेत सहभागी आहेत. 1 ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली होती. ठार केलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
या कारवाईवर जम्मू-कश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात आणि लष्कराच्या उत्तरी कमांडचे लेफ्टिनेंट जनरल प्रतीक शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी 24 तास लक्ष ठेवून आहेत.