विरवडे बु /प्रतिनिधी
कुरुल ता मोहोळ येथे मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून दाम्पत्याला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. हा प्रकार २६ मार्च रोजी पहाटे १ वाजता घडला.
कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुल येथील हनमंत विठ्ठल घोडके हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुनेसह राहतात. २५ मार्चच्या रात्री ते घर बंद करून झोपले असता, पहाटे १ वाजता त्यांच्या पायावर अचानक कोणाचा तरी जोरात पाय पडल्याने हनमंत घोडके यांची झोप उघडली. समोर तोंड बांधलेला एक इसम उभा असल्याचे पाहताच त्यांनी विचारणा केली. त्याच वेळी त्या इसमाने त्यांच्या तोंडावर काहीतरी फवारले.
चोर-चोर म्हणून ओरडताच त्यांची पत्नीही जागी झाली. त्याच वेळी आणखी दोन चोरटे पाठीमागून आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवत पती-पत्नीला मारहाण केली. यानंतर, चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडले, कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दोन मोबाईल मिळून १ लाख १० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आणि चोरटे पसार झाले.
घोडके दाम्पत्याने मोठ्याने ओरडताच शेजारच्या खोलीत झोपलेला मुलगा उठला आणि चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेमुळे कुरुल परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
—