नाशिक, 8 सप्टेंबर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जीआरला सत्तेत असलेले मंत्री छगन भुजबळ विरोध करत आहेत. या आरक्षणाशी संबंधित समितीत ओबीसी नेते मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार गोरे हेही होते. यामुळे आता ओबीसीच्या नावाखाली होणारा विरोध पाहता मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्येच एकमत नसल्याचा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सरकारला ओबीसी विरुध्द मराठा वाद उभा करायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा १४ सप्टेंबरला शहरात मेळावा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आमदार रोहित पवार नाशिक दौऱ्यावर होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचे सरकारला आधीच माहिती होते. किती लोक येतील याचाही अंदाज होता. मात्र पुरेशा सुविधांअभावी आंदोलन हाताबाहेर गेले.’ माजी आमदार सुनील भुसारा, खासदार भास्कर भगरे, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार उपस्थित होते.