अमरावती, 24 एप्रिल (हिं.स.)।
ज्या महिलांना पीएम किसान सन्मान व नमो शेतकरी योजनेंतर्गत वर्षाला १२ हजार रुपये मिळतात, त्यांना आता लाडकी बहीण योजनेत महिन्याला दीड हजार रुपयांऐवजी ५०० रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील महिलांची पडताळणी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना जुलै २०२४ पासून १ हजार ५०० रुपये दरमहा अर्थसाहाय्य दिले जात आहे. नवीन आर्थिक वर्षापासून यात वाढ करण्याचा निर्णयही शासनाने घेतलेला आहे; परंतु प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार हे अजूही जाहीर केले नाही.दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना प्रतिवर्ष १८ हजार रुपयांच्या मर्यादेत कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळेल. त्यांना लाडक्या बहीण योजनेचे केवळ ५०० रुपये मिळणार आहेत.
एप्रिलचा हप्ता केव्हा?
नवीन आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. हा हप्ता अक्षय तृतीया किंवा त्यापूर्वी मिळू शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.