लातूर, २९ ऑगस्ट : लातूरमध्ये काल रात्री पुन्हा अतिवृष्टीमुळे उदगीर मतदार संघातील धडकनाळ व बोरगाव या गावात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावात पाणी शिरुन गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची बातमी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी धडकनाळ व बोरगाव बु. या गावांना भेट दिली तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या सुचना आमदार संजय बनसोडे यांनी प्रशासनास दिल्या आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मागील आठवड्यात ही अशीच पुरग्रस्त परिस्थिती उद्भवुन गावाशेजारील जनावरांचे शेड व त्यामधील शेकडो शेळ्या व जनावरे वाहून गेली आहेत. विद्युत प्रवाहाचा डी.पी. व वाहने वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी आपण प्रशासनाच सुचना देवून मदत कार्य चालु ठेवले होते. त्यावेळीही पंचनामे करण्यात आले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने यावर आपण लवकरच तोडगा काढणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, कार्यकारी अभियंता रवींद्र महाव्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके, जलसंधारणचे रणजित नाईक, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, आदीसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
