सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)।
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने केलेल्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने काळाकोट न घालण्याची सवलत दिली आहे. ३० जूनपर्यंत ही सवलत असणार आहे.
सोलापूरसह राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. दररोज तापमानाचा पारा ४१ अंशावर पोचला आहे. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने वकिलांना काळ्या कोटामुळे उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून ही सवलत दिली आहे. वकील आता ३० जूनपर्यंत पांढऱ्या शर्टमध्ये दिसतात. त्यानंतर मूळवेशात वकिली करताना दिसतील.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर व माळशिरस या ठिकाणी न्यायालये आहेत. याशिवाय सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय आहे. या ठिकाणी सुमारे साडेसहा हजार वकील काम करतात. त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.