इस्लामाबाद, 3 जून (हिं.स.) : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी परदेशात आपले सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवले होते. यानंतर पाकिस्तानचे सत्य उघड सर्वांसमोर उघड झाले. दरम्यान , आता पाकिस्तानने भारताची कॉपी करत सोमवारी(दि.२) अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवले आहे. पाकिस्तान या देशांमध्ये जाऊन भारतीय सैन्याने त्यांचे हवाई तळ आणि लष्करी तळ कसे उद्ध्वस्त केले त्यांची बाजू मांडेल. खोटी माहिती देऊन जगाची सहानुभूती मिळवणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निर्देशानुसार, एक उच्चस्तरीय बहुपक्षीय शिष्टमंडळ सोमवारपासून न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन आणि ब्रुसेल्सला भेट देत आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली. नऊ सदस्यांच्या शिष्टमंडळात संघीय मंत्री मुसादिक मलिक, माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि खुर्रम दस्तगीर खान, माजी मंत्री सय्यद फैसल अली सब्जवारी, शेरी रहमान, सिनेटर बुशरा अंजुम बट यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात माजी परराष्ट्र सचिव – जलील अब्बास जिलानी आणि तेहमीना जंजुआ यांचाही समावेश आहे.
भारताने ३३ देशांना भेट देऊन फक्त पाकिस्तानचा पर्दाफाश केला नाही तर भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागेल असा संदेशही दिला. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध केला.आता पाकिस्तानने आपले शिष्टमंडळ पाठवून खोटी माहिती देऊन जगाची सहानुभूती मिळवणे चालू केले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. आता लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी बांगलादेशातील कट्टरपंथींसोबत हात मिळवणी केली आहे.
भारतात दहशतवाद्यांचे नवे नेटवर्क उभं करून स्लीपर सेल बनवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या दोन्ही दहशतवादी संघटना भारताने केलेल्या कारवाईनंतर आक्रमक झाल्या आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्याची संधी ते शोधत आहेत. सध्या भारत-बांगलादेश यांच्यात संबंध ठीक नाहीत त्याचा पाकिस्तानी दहशतवादी फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.