मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता सर्वांसाठी लोकल सुरू होणार आहे. १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकलने प्रवास करता येणार आहे. विविध नियमांचे पालन करत प्रवाशांना लोकलमधून प्रवास करावा लागणार आहे. कोरोना संकटामुळे मुंबईत लोकल सेवा बंद करण्यात आली होती. नंतर ती अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. आता यामध्ये सर्वच मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.

कोरोनामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. हळूहळू लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांची हेळसांड होत होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेळेच्या काही नियमांसह सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विशिष्ट वेळांच्या निर्धारित करून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
– सर्वसामान्य प्रवाशांसाठी अशी सेवा उपलब्ध असणार आहे :
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.
* यावेळेला प्रवास करता येणार नाही
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
