नवी दिल्ली – पावसाळी अधिवेशनाच्या ११ व्या दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकारने सभागृहात क्रीडा संबंधित विधेयक मांडले होते. कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत या विधेयकावर दोन दिवस चर्चा होण्यास सहमती झाली होती, असे रिजिजू यांनी सांगितले.
क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी विधेयकांचे महत्त्व अधोरेखित केले, मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला आणि अखेर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, लोकसभेच्या सदस्या आर. सुधा यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना माहिती दिली की, मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली आहे.
राज्यसभेतही झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.