मुंबई, 23 जुलै – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रणी नेते, समाजसुधारक आणि लोकशाही मूल्यांचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
या वेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरणास्थान होते. देशहित, सामाजिक अस्मिता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. ‘केसरी’ वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेला निर्भीडपणे आव्हान दिले, तर ‘गीतारहस्य’ ग्रंथातून कर्मयोगाचा संदेश दिला. त्यांची विचारसरणी आजही समाजासाठी प्रकाशवाटा दाखवणारी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “टिळकांचे विचार महाराष्ट्रात आजही तितक्याच ताकदीने जिवंत आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक यांचे कार्यही लक्षणीय होते. आज उपसभापती या नात्याने मला लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याचा मान लाभल्याने मी गौरवित झाले आहे.”
या अभिवादन कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, सचिव (कार्यभार-१) जितेंद्र भोळे, सचिव (कार्यभार-४) शिवदर्शन साठ्ये, उपसभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
टिळकांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम लोकशाही मूल्यांप्रती कृतज्ञतेचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला.