नवी दिल्ली, 12 ऑगस्ट – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांना हटविण्याचा प्रस्ताव स्वीकारत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. वर्मा यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
स्थापित समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बी. व्ही. आचार्य यांचा समावेश आहे. ही समिती शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करणार असून, अहवाल येईपर्यंत प्रस्ताव प्रलंबित राहील.
सर्वोच्च न्यायालयाने याआधीच वर्मा यांच्या अंतर्गत प्रक्रियेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका फेटाळल्याने ही कारवाईचा मार्ग मोकळा झाला होता. वर्मा यांनी त्यांच्या निवासस्थानातून सापडलेल्या जळालेल्या रोख रकमेच्या चौकशी समितीचा अहवाल अवैध ठरवण्याची मागणी केली होती. तसेच, तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या त्यांना हटवण्याच्या शिफारसीलाही आव्हान दिले होते.