अमरावती, 6 एप्रिल (हिं.स.) उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने भाजीपाला बाजारात लिंबाचे भाव वाढताना दिसून येत आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की लिंबाचा तोरा वाढतच असतो. उन्हाळ्यात शारीरिक एनर्जी वाढवण्यासाठी अनेक जण लिंबू पाणी किंवा सरबताला प्राधान्य देतात. काहींना जेवताना लिंबूची फोड लागतेच. त्यामुळे लिंबाचे दर वाढले असून मेपर्यंत तेजी राहणार, असे विक्रेते सांगतात. त्यातच एपीएमसी भाजी मंडईत लिंबाची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. त्याचा फटका किरकोळ बाजाराला बसू लागला आहे. दोन लिंबाची किंमत आठ ते १० रुपये इतकी झाली आहे. तीदेखील लिंबूच्या आकारानुसार ठरवली जाते.
शहराच्या होलसेल मार्केटमध्ये दररोज ४०० ते ५०० क्विंटल लिंबाची आवक होत आहे. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये घाऊक बाजारामध्ये ४०० ते ६०० रुपये १०० नग अशी किंमत वाढ झाली आहे. एक लिंबू पाच ते सहा रुपयांना मिळत असून, किरकोळ बाजारात तर १० रुपयाला २ तसेच १५ रुपयांना तीन नग किंमत दिसून येत आहे. त्यामध्येही आकारानुसार व्यापारी किंमत सांगतात.
गेल्या महिन्यापर्यंत दोन ते तीन रुपयांना एक किंवा १० रुपयांत चार ते पाच असा भाव असणाऱ्या लिंबाची आता मागणी वाढली आहे. तुलनेने बाजारात पुरवठा कमी असल्याने या लिंबांचा भाव थेट १० रुपयांना दोन झाला आहे. प्रामुख्याने सरबत, सोडा, उसाचा रस यामध्ये लिंबाचा वापर केला जातो. त्यातच मागील आठवड्यापासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे आपसूकच थंड पेयांची मागणी वाढली आहे.
सध्या किरकोळ बाजारात १० रुपयांना २ आणि १५ रुपयांना तीन याप्रमाणे लिंबू मिळत आहे. नेहमीच्या आहारात लिंबाची फोड आवर्जून घेतली जाते. वरणात टोमॅटो ऐवजी लिंबाचा वापर केला जातो. तसेच उन्हाचा पारा वाढू लागल्याने लिंबू सरबत, उसाच्या रसात देखील वापर होत आहे. याचबरोबर लिंबाचे लोणचेही केले जाते; मात्र भाजी मंडईत लिंबू भाव खाऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी २० रुपयांना सहा लिंबू मिळत होते मात्र आता भाववाढ झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे किमती अधिक झाल्या असल्या तरी उष्णतेचा दाह कमी करून आरोग्याची काळजी घेणाऱ्या लिंबाला ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.