मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. देशभर खूप मोठ्या उत्साहात, विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. समाजमाध्यमांवर तर शुभेच्छां, फोटो, व्हिडिओंचा वर्षाव होत आहे. मात्र यातही शिवसेना नेत्यानेही अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देऊन चिमटाच काढला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. तसेच संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावं लागेल. देशातील जनतेच्या महागाईच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच असतील, पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असं वाटते म्हणत टोला लगावला आहे.
“नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असले तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही अशा शब्दांत त्यांनी मोदी यांचं कौतुक केलं. ते पुढे म्हणाले, आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे बघावं लागेल. पण मला खात्री आहे की देशातल्या महागाईसंदर्भातल्या जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील. आमचं लक्ष पंतप्रधान मोदींकडे आहेत”, अशा शब्दांत राऊतांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मोदींचं कौतुक करताना म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशातले मोठे नेते आहेत. ते आता देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांच्या कार्यकालात देशाला राजकीय स्थैर्य आलं आहे. आत्तापर्यंत आघाडीमध्ये राहून सत्तेवर येणाऱ्या भाजपाकडे एकहाती सत्ता येणे ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे हे मान्य केलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही. त्यांच्या भूमिकेविषयी, कार्याविषयी कितीही वाद असले तरी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना आपण शुभेच्छा द्यायला हव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो, असे आवर्जून म्हणाले.
दर दुसरीकडे पुण्यात राऊतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढला आहे. ”शिवसेना नेते संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार” असं मला कळतंय, अशा मिस्कील शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना चिमटा काढला.
” चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं”, असा टोला संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी हे पुण्यात एका कार्यक्रमात वक्तव्य केले.
त्यावेळी राऊत यांच्या विनोदी टीकेला, चंद्रकांत पाटील यांनीही विनोदी शैलीतच उत्तर दिलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय सुरू आहे हे समजण्याइतपत मी मनकवडा नाही. माहीत नाही ते का असं म्हणाले. मात्र राऊतांना कोणी फार गंभीरतेनं घेत नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
* अजून काही तास बाकी आहेत !
‘मला माजी मंत्री म्हणू नका. पुढील दोन-तीन दिवसांत कळेल”, असे पाटील यांनी गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यांच्या या धक्कादायक विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पाटील यांच्या विधानाबद्दल भाष्य करताना संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचे म्हणत टोला लगावला होता. या विधानाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ”मी ते विधान करून केवळ एक दिवस उलटला आहे. अजून काही तास बाकी आहेत, असे म्हणून राजकीय उत्कंठा वाढवली आहे.