मुंबई, ३० जुलै – मालेगाव शहरात १७ वर्षांपूर्वी घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा अंतिम निकाल गुरुवारी, ३१ जुलै रोजी, विशेष एनआयए न्यायालयात दिला जाणार आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.
या प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण सात जण आरोपी आहेत. विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
‘हिंदू दहशतवाद’चा पहिला उल्लेख
या प्रकरणाला देशाच्या राजकीय व सामाजिक इतिहासात अत्यंत संवेदनशील मानले जाते, कारण यामध्येच पहिल्यांदाच ‘हिंदू दहशतवाद’ आणि ‘भगवा दहशतवाद’ हे शब्द वापरण्यात आले होते. निकालाच्या दिवशी न्यायालयीन संकुलातील इतर खटल्यांची सुनावणी स्थगित ठेवण्यात येणार असून, काही खटल्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय वापरला जाणार आहे.
१२ पैकी ५ जण निर्दोष
या खटल्यात एकूण १२ जण आरोपी होते. त्यापैकी ५ जणांना खटला सुरू होण्यापूर्वीच निर्दोष ठरवण्यात आले. उर्वरित सात आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
स्फोटाची पार्श्वभूमी
२९ सप्टेंबर २००८ रोजी, रमजान महिन्यादरम्यान रात्री ९.३५ वाजता, मालेगावच्या भीखू चौकात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता. दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मालेगाव हे ठिकाण मुंबईपासून सुमारे २९१ किमी अंतरावर आहे.
निकालपूर्व प्रक्रियेचा आढावा
१९ एप्रिल रोजी, विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आणि ८ मे रोजी आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता न्यायालयाने ३१ जुलै ही अंतिम निकालाची तारीख निश्चित केली आहे.