मुंबई, 2 सप्टेंबर – “आम्ही मराठ्याची औलाद आहोत. कितीही भीती दाखवली तरी आझाद मैदानावरून उठणार नाही. न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही. आरक्षणाशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही,” असा ठाम इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. पोलिसांकडून मैदान रिकामे करण्याची नोटीस आल्यानंतर त्यांनी सरकारविरोधात आपली भूमिका ठामपणे मांडली.
जरांगे म्हणाले, “शनिवार-रविवारी मराठे मुंबईत दाखल झाले, तर सोमवारच आंदोलन वेगळ्या पातळीवर असेल. मराठा हुशार आहे, शिस्तबद्ध आहे आणि न्याय मिळेपर्यंत हटणार नाही. दोन वर्षांपासून आंदोलन लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत आहे. कोर्टाचे आदेश आल्यानंतर लगेच रस्त्यावरच्या गाड्या हटवून मैदानात लावल्या, त्यामुळे वाहतूककोंडी नाही. तरीही सरकार अन्याय करत आहे.”
त्यांनी मागणी केली की, बलिदान गेलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी द्या, मिळालेल्या ५८ लाख नोंदींच्या आधारे गावोगावी कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, शिंदे समितीने देवस्थान व कारागृह नोंदी शोधून स्वतंत्र कार्यालय द्यावे. “मराठा-कुणबी एकच आहेत” हा जीआर लागू करावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले, “आमच्यावर लाठीमार करण्याचा विचारही करू नका. तुरुंगात नेलं तरी उपोषण सुरू राहील. आझाद मैदानातून मराठ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील.”
चर्चेसाठी सरकार आले तर आम्ही त्यांचा सन्मान करू, पण “३०-३५ मंत्री नकोत, फक्त दोन मंत्री आले तरी पुरेसे,” असे ते म्हणाले. “हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेटला सरकारने विरोध का करावा? आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवतो, पण आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. फडणवीस साहेब, मराठ्यांचा अपमान करू नका, नाहीतर परिणाम घातक ठरतील,” असा इशारा त्यांनी दिला.