मुंबई, २९ ऑगस्ट. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा आज मुंबईत दाखल झाला आणि अवघ्या काही तासांत संपूर्ण शहर भगव्या लाटेत सामावून गेले. आझाद मैदानाची क्षमता काही वेळातच संपली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरापासून ते फोर्ट, कुलाबा, भायखळा, मानखुर्द, वडाळा, शिवडी, रे रोड, मझगाव अशा ठिकाणी आंदोलकांची गर्दी उसळली होती. परिणामी मुंबईच्या दक्षिण मध्य भागात भीषण वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले होते. हजारो वाहनं अडकल्यामुळे प्रवासी अनेक तास जागच्या जागी अडकून पडले होते.
सकाळी मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी आझाद मैदानात पोहोचताच आंदोलकांचा ओघ वाढला आणि अवघ्या काही मिनिटांत मैदान तुडुंब भरून गेले. गर्दी मैदानाबाहेर सुद्धा उसळल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर ठप्प झाला होता. बेस्ट बस, टॅक्सी, खासगी गाड्या यांची प्रचंड कोंडी झाल्याने हजारो प्रवाशांचे वेळापत्रक बिघडले. सकाळी ऑफिस, नोकरी, शाळा, कॉलेजकडे धाव घेणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड फटका बसला. वाशी, पनवेल, ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगा अटल सेतू, फ्री वे आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लागल्या होत्या. काही ठिकाणी दहा किलोमीटरपर्यंत वाहनांचा ताफा रेंगाळताना दिसला होता.
भायखळा परिसरात सकाळपासूनच वाहनांची कोंडी सुरू झाली होती. पोलिसांनी आंदोलकांच्या वाहनांना जेजे फ्लायओव्हरवर थांबवून त्यांना मोहम्मद अली रोडकडे वळवले गेले. वाडी बंदर येथील बीपीटी परिसरात आंदोलकांच्या गाड्या पार्क करण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र तरीही मुख्य मार्गांवर वाहनांचा खोळंबा कमी झाला नाही. शीव-पनवेल मार्ग, मानखुर्द ते देवनार डेपो, बॅरिस्टर नाट पै मार्गावर वाहतूक खिळून बसली. परिणामी बससेवा विस्कळीत झाली आणि ४६, ५०, ए-४२, ए-१३५ अशा अनेक बसमार्गांवर वाहतूक खंडित करावी लागली होती.
कुलाबा भागातही वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. कोस्टल रोडवर ब्रीच कँडी एक्झिटजवळ ही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मानखुर्द परिसरात पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या थांबवल्याने चार किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. या सर्व परिस्थितीमुळे सकाळपासून प्रवासी अक्षरशः हैराण झाले. मुंबईतील लोकल ट्रेनमध्येही प्रचंड गर्दी वाढली कारण बस सेवा ठप्प झाल्याने प्रवासी रेल्वेकडे वळले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताना सरकारने आरक्षणाची मागणी मान्य करावी, अशी ठाम भूमिका मांडली. त्यांनी आंदोलकांना आवाहन केले की, “मुंबईत अनावश्यक गर्दी करू नका, पोलिसांना सहकार्य करा, गाड्या ठरवून दिलेल्या ठिकाणी पार्क करा आणि दोन तासांत मुंबई खाली करा.” मात्र आंदोलनाला मिळालेला व्यापक प्रतिसाद पाहता शहरभर वाहतूक यंत्रणा कोलमडली.
मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होत असल्याने सायन-पनवेल हायवेला मराठा आंदोलकांना अडविण्यास येत होते. बाहेरून आलेल्या गाड्यांना वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पार्क करून ट्रेनने मुंबईत जाण्याचा पोलीसांचा सल्ला दिला जात होता. गाड्या मुंबईत घेऊन न जाता ट्रेनने प्रवास करा असे पोलीसांकडून मराठा आंदोलकांना आवाहन केल जात होते.
पण पावसाने हजेरी लावूनही आंदोलकांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही. “मुघल रोखू शकले नाहीत, आदिलशाही रोखू शकली नाही, हे सरकार काय मराठ्यांना रोखणार?” अशा शब्दांत आंदोलकांनी आपली भावना व्यक्त केली. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आझाद मैदानालाही फटका बसला. मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, चिखल झाला होता. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत मराठा आंदोलकांचा उत्साह अजूनही कायम आहे. “सकाळपासून आम्ही इथेच उभे आहोत, अजून जेवणसुद्धा झालं नाही पण आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही जाणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मराठा आंदोलकांनी सीएसएमटीनंतर चर्चगेट स्टेशन काबीज करण्यात आला. मुंबईतील जोरदार पावसाने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अशात, आडोसा घेण्यासाठी मराठा आंदोलक विविध ठिकाणी आसरा घेत होते.
मात्र या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे हाल झाले. वेळेवर ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यात अनेक नागरिकांना अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले.