छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
विभागात ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली नांदेड या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. मराठवाड्यात सर्वदूर पूर परिस्थिती असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बीड जिल्ह्याला बसला आहे. बीड जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर केकाणवाडी पाझर तलाव आणि राक्षसवाडी साठवण तलाव फुटला. पुलावर पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला.
आष्टी तालुक्यातील कडा, पिंपरखेड, निमगाव चोभा या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे कांबळी, कडी नदीला महापूर आला. धामणगाव येथील अफरोज बागवान (वय ३०) व घाटा पिंपरी येथील श्रावण तुकाराम शिंदे (वय ५९) हे पुरात वाहून गेले.
पुरात अडकलेल्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून ५१ जणांना बाहेर काढण्यात आले. मराठवाड्यात चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन सतर्क असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.