आदर्श व प्रजाहितदक्ष राजा म्हटला म्हणजे सर्वप्रथम नाव पुढे येतं ते प्रभु रामचंद्र यांचं.इतकेच नव्हे तर एकवचनी,न्यायी, चारित्र्यवान, पराक्रमी, विद्याविभूषित, मातृपितृभक्त, आज्ञाकारी सुपुत्र अशा अनेक गुणवैशिष्ट्य्यांनी विभूषित असलेले धनुर्धारी प्रभू रामचंद्र यांचं गुणगान करताना साक्षात वसिष्ठमुनींना शब्द तोकडे पडत असत.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे प्रभू श्रीरामासारखा राजा पुन्हा होणे नव्हे.
चैत्र शुद्ध नवमीला आकाशात सूर्य डोक्यावर आला असता,राजा दशरथाची भार्या महाराणी कौसल्याच्या उदरी रामाचा जन्म झाला अन् जणू दैत्यांचा सर्वनाश करणारा शूरवीर राजाच उदयास आला.त्या दिवशी अयोध्यावासींचा आनंद गगनात मावत नव्हता.त्यांना आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं.या आनंदोत्सवात राजवाड्यातून विद्वानांना- पंडितांना सुवर्णमुद्रा तर,सैनिकांना व प्रजाजनाला धन,वस्त्रे अन् गोधनाचे दान अर्पण करण्यात आले.ढोल,नगारे, तुताऱ्या व मंगलवाद्यांनी सारा आकाश-धरती दुमदुमून गेली होती.प्रभू रामचंद्रांच्या जन्मानिमित्त
अयोध्यावासियांनी काढलेली शोभायात्रा पाहण्याच्या मोहाने साक्षात सूर्यदेव म्हणे त्या दिवशी नेहमी पेक्षा बऱ्याच उशिराने अस्ताला गेले,अशी आख्यायिका आहे.या शुभ प्रसंगी देवी-देवतांकरवी आकाशातून पुष्पवृष्टी झाली..जणू पृथ्वी अन् आकाशातून श्रीरामाच्या जन्माचे भव्यदिव्य स्वागतच झाले.
गुरुवर्य वशिष्ठ मुनी हे दशरथ राजाला कोटी कोटी आशिर्वाद देत म्हणाले,”तुझ्या राणीच्या उदरी दुष्ट नरसंहारी राक्षसाचा सर्वनाश करणारा तर,सज्जनांचे रक्षण करणारा अन् सदधर्माची ध्वजा उंचविणारा कुलदीपक उदयाला आला.” कौशल्येचा राम;सुमित्रेचा लक्ष्मण; कैकेयीचा भरत व शत्रुघ्न या दशरथ पुत्रांचे एकच जीवन ध्येय होते..ते म्हणजे दुष्ट राक्षसांचा संहार करणे.या ध्येयप्राप्तीसाठी राजा दशरथाने आपल्या चारी सुपुत्रांचे मौजबंधन करून त्यांना विद्यार्जनासाठी गुरुवर्य वशिष्ठ मुनींच्या आश्रमात पाठविले.विशेष करून श्रीरामाचे धनुर्विद्येतील कौशल्य तर वशिष्ठ मुनींना थक्क करून सोडी.म्हणूनच आम्ही सर्व त्यांना जय धनुर्धारी…, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीता राम म्हणतो.
प्रभू रामचंद्र हे वर्णाने सावळे पण अतिशय देखणे.चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज तर,चंद्रासारखं शांत मन.माता पित्याचे अन् गुरुजनांचे शब्द न शब्द शिरसावंद्य मानणारा व प्रजाहितदक्ष असा आदर्श राजा अशी त्यांची रयतेत ख्याती. एरवी प्रजाजनां साठी फुलासारखं कोमल असलेल त्यांचं हृदय दुष्टांशी वागताना मात्र वज्रासारख कठीण होई.वचन दिलं म्हणजे ते पूर्ण करणे,हा प्रभू रामचंद्र यांचा धर्म होता.गोरगरीब लोकांबद्दल त्यांच्या मनात मोठी कणव होती.म्हणूनच श्रीराम हे रयतेच्या गळ्यातले जणू ताईतच बनून राहिले.
विदेह राज्याची राजधानी मिथिलचे राजा जनक यांनी आयोजित केलेल्या सीता स्वयंवरच्या सोहळ्यात विश्वामित्रांनी श्री रामचंद्रांना नेलं.या सोहळ्यात जनक राजाने देशोदेशींच्या राजांना -राजपुत्रांना निमंत्रित केलं होतं.खरं तर,अवजड असं विराट शिवधनुष्य पाहूनच अनेक राजांनी आपलं अवसानच गमावलं.विशेष म्हणजे लंकाधीश रावण पण शिवधनुष्य उचलताना अक्षरश: जमिनीवर कोसळले.सरतेशेवटी
श्रीरामांनी विश्वामित्राच्या आज्ञेने शिवधनुष्य उचलून ते काडकन मोडून समस्त राजे- प्रजाजनांसमोर ठेवलं.हे अपूर्व दृश्य पाहून राजदरबारात श्रीरामांच्या नावाचा जयघोष झाला.वाद्यांच्या निनादात राम-सितेवर पुष्पवर्षाव झाला.सीतामाई लाजत -लाजत मंदगतीने श्रीरामापाशी गेल्या अन् त्यांच्या गळ्यात माळ टाकली.या मंगलमय प्रसंगी विश्वामित्र,राजा जनक,राणी सुनंदा आदी विभूतींनी राम सीतेला शुभ आशिर्वाद दिलेत.
परंतु हा आनंद व हर्षोल्लास जास्त काळ टिकला नाही.त्याला कोणाची तरी दृष्ट लागली.महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात राणी कैकेयीच्या हट्टापायी दशरथ राजाने रामाला १४ वर्ष वनवासात पाठविले अन् भरतला राजगादी दिली.रामासह सीता व लक्ष्मण यांनी देखील वनवासात प्रयाण केलं. वनवासाच्या काळात रावणाने कपटनितीने
सीतामैय्याचे अपहरण केले.तथापि संवेदनशिलता दाखवत…प्रभू रामचंद्रांनी भ्राता लक्ष्मण, श्री.हनुमान,सुग्रीव,अंगदसह वानरसेनेच्या मदतीने प्रभू रामचंद्र यांनी दशमुखी रावणाला रणभूमीवरच ठार केलं,तर रावणाचे बंधू बिभीषण यांना लंकेत राजपद दिलं.महत्वाचे म्हणजे आदर्श व न्यायी राजा म्हणून श्रीरामांचा सर्वत्र जयजयकार झाला.
दरम्यान अशोकवनातून सीतामैय्याची सुटका झाली.तथापि,प्रजाजनांच्या मनात संशयाला जागा राहू नये,म्हणून सितामैय्याला आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागलं.त्याप्रसंगी अग्निकुंडातून अग्निनारायणाचे शब्द बाहेर पडले,” श्रीरामा,सीता ही पूर्णतया पवित्र आहे,तिचा तुम्ही स्वीकार करा”.त्यानंतर सीतामैय्या अग्नीकुंडातून सुखरूप बाहेर आल्या. त्यावेळी उपस्थित प्रजाजनांनी सीतामैय्याच्या नावाचा जयजयकार केला.आकाशातून देवदेवतांनी सितेवर पुष्पवर्षाव केला.त्यानंतर पुष्पक विमानाने राम-लक्ष्मण-सीता अयोध्येत आले.त्याप्रसंगी लोकांनी त्यांचे भव्यदिव्य स्वागत करत विजयोत्सव साजरा केला.त्यानंतर लगेच राजा भरतने अयोध्येचे राजसिंहासन श्रीरामांना स्वाधीन केलं.कालांतराने सीतामैय्याच्या उदरी दोन सुपुत्रांचा जन्म झाला.त्याचं नाव लव कुश.प्रभू रामचंद्रांच्या राज्यात प्रजाजन आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदू लागले.आणि सज्जनांचा कैवारी,तर दुर्जनांचा वैरी अशी रामाची महती सुवर्णाक्षरांनी रामायणात लिहिली गेली.
जय🏹श्रीराम! जय🚩सीतामैय्या*!
लेखक रणवीर राजपूत