– एससीओ अध्यक्षपदासाठी भारताकडून चीनला पाठिंबा
बीजिंग, 14 जुलै (हिं.स.)। भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे चीनची राजधानी बीजिंग येथे पोहोचले आहेत. बीजिंगला पोहोचताच त्यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. जयशंकर यांनी एक्स पोस्टवर भेटीचा फोटो शेअर करत लिहिले, “आज बीजिंगमध्ये पोहोचताच उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेऊन मला आनंद झाला. चीनच्या एससीओ (शांघाय सहकार संघटना) अध्यक्षपदासाठी भारताचा पाठिंबा व्यक्त केला.”
परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, या भेटीत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या या भेटीद्वारे एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. बीजिंगला रवाना होण्यापूर्वी, जयशंकर यांनी रविवारी सिंगापूर येथे उपपंतप्रधान गॅन किम योंग यांची भेट घेतली. त्यांनी म्हटले की, तिसऱ्या भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेसाठी त्यांना उत्सुकता आहे. जयशंकर यांनी नमूद केले की, सिंगापूरसोबत विविध द्विपक्षीय उपक्रमांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे.
या आधी, जयशंकर यांनी त्यांच्या समकक्ष विवियन बालाकृष्णन यांच्याशीही चर्चा केली. जयशंकर म्हणाले की, “सिंगापूर हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाच्या केंद्रस्थानी आहे.” या बैठकीविषयी विवियन बालाकृष्णन यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले, “जसे-जसे जग बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे, तसं भारत हा महत्त्वपूर्ण ‘ध्रुव’ म्हणून उभरत आहे.”
उल्लेखनीय म्हणजे, परराष्ट्र मंत्री जयशंकर तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार संघटना (एससीओ) च्या परिषदेत सहभागी होणार आहेत.