अमरावती, 19 ऑगस्ट – मेळघाटातील सततधार पावसामुळे पंचतरीतांसह उपनद्यांना पूर आला असून ५० हून अधिक खेडी अडचणीत सापडली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने धारणी व चिखलदरा तालुक्यांतील घनदाट अरण्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपुढे उपासमारीचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नदीकाठच्या व ओहळलगतच्या वस्त्यांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून महसूल प्रशासनाकडून एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सूर्यपुत्री तापी नदीसह सीपना, गडगा, खंडु, खापरा आणि डोलार या नद्यांना प्रचंड पूर आला आहे. राजादेही, डवाल, कुकरी, मेलडोह, कावरा, टिंगच्या आणि चमारकुंडी यांसारख्या उपनद्यांचे पाणी मिळाल्याने नद्यांचा प्रवाह आणखी वाढला आहे.
चिखलदऱ्यात डोंगर पठारावरील आदिवासी वस्त्यांवर नैसर्गिक संकट ओढवले असून ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक साधने ठप्प झाली असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. धारणी तालुक्यातील राणीगाव, बैरागड, खोपमार, रंगबेली, चौराकुंड, झिलांपाटी, कबडाझरी तसेच चिखलदऱ्यातील भुत्रुम, रुहीपठार, भाडूम या गावांवर दळणवळणाचे संकट ओढवले आहे.
परतवाडा आगारातून सुटणाऱ्या एसटी बससेवा पावसामुळे तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेचा प्रवास आणि आपत्कालीन संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील ४८ तास निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले असून प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.