सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे दिनांक 18 मे 2025 रोजी पहाटे एका टॉवेल कारखान्याला आग लागून त्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. तसेच यापूर्वीही एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना झालेल्या असून अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी एक उपसमिती गठित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे झालेल्या टॉवेल कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज महापालिका प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध विभाग व यंत्रमाग संघ यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवी पवार तसेच संदीप कारंजे, अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील व सोलापूर यंत्रमाग संघाचे पदाधिकारी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.