सोलापूर, 4 सप्टेंबर।
राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी एक ऑगस्टला एक रुपया आणि २१ ऑगस्टला एक रुपया याप्रमाणे दोनवेळा दरवाढ करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा एक रुपया वाढवण्यात आल्याने गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर ३५ रुपयांवर पोचला. पण पशुखाद्याचे वाढते दर आणि अन्य खर्च या आधीच आवाक्याबाहेर गेल्याने हा दर केवळ खर्चाच्या तोंडमिळवणी पुरताच ठरणारा असल्याची वस्तुस्थिती आहे.
गेल्या महिनाभरापासून बटर, दूध पावडरचे दर वाढले आहेत. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थांना चांगला उठाव मिळणार आहे. परिणामी दुधालाही मागणी वाढणार आहे, हे लक्षात घेऊन दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय संघांनी घेतला आहे. त्यामुळेच मागच्या महिनाभरात ३ वेळा दुधाच्या खरेदीदरात संघांना वाढ करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. ही दरवाढ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ दुधासाठी देण्यात येणार आहे. राज्यात प्रतिदिन साधारणः पावणे दोन ते दोन कोटी लिटरपर्यंत दूध संकलन होते. पण सध्या दीड कोटी लिटरपर्यंत संकलन खाली आले आहे. मागच्या काही दिवसांत पशुखाद्याचे वाढते दर, चाऱ्याची टंचाई, यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. पण आता पाऊसमान चांगले झाले आहे. त्यामुळे आगामी काळात चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.