पालघर, २८ ऑगस्ट. विरार (पू.) येथील विजय नगर भागातील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग २६ ऑगस्टच्या मध्यरात्री कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ६ महिला, ८ पुरुष आणि ३ बालकांचा समावेश आहे. तर ९ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दुर्घटनास्थळाची पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला.
त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले तसेच जखमी नागरिकांना रुग्णालयात भेट देऊन त्यांची विचारपूस केली. दुर्घटनेनंतर महापालिका, अग्निशमन दल, NDRF आणि पोलिसांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. शेजारील चाळींना धोका असल्याने नागरिकांना स्थलांतरित करून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामास जबाबदार असलेल्या जमीन मालक व विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक झाली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेने उचलावा, अशा सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या. या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक, महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
