सांगली, २४ ऑगस्ट: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरनंतरच्या व्यवस्थापनासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोयना व वारणा धरणातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या जास्त पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी इशारा पातळी ओलांडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
पाटील यांनी सांगितले, “शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई द्यावी.” त्यांनी पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले. पूरपश्चात साफसफाई, औषध फवारणी आणि निवारा केंद्रांमधील सुविधांवर भर देण्यात आला.
त्यांनी वारणा धरणावर पाणीपातळी दर्शविणारी यंत्रणा विकसित करण्याचे सुचवले. गणेशोत्सवादरम्यान अतिवृष्टीच्या अंदाजासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. आयर्विन पुलाला पर्यायी पूल तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, यंत्रणांमधील समन्वयामुळे धोका पातळी गाठू दिली नाही. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी वेळीच कारवाई केल्यामुळे पुराचा मोठा धोका टाळता आला.