सांगली, २४ ऑगस्ट: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरबाधित नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील विविध भागांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
पाटील यांनी सांगली, वाळवा आणि पलूस तालुक्यातील पूरप्रभावित भागांची पाहणी केली. निवारा केंद्रांमध्ये अन्नदाना आणि आरोग्यसेवांच्या गुणवत्तेचा प्रत्यक्ष तपास केला. त्यांनी शासन आणि प्रशासन यांना पूरबाधितांसाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यास सांगितले.
भविष्यातील पूरसंकटांसाठी पाटील यांनी पूर्वतयारीच्या महत्त्वावर भर देताना सांगितले, “पूरप्रवण गावांमध्ये पाण्याच्या कमाल पातळीची निशाणी करावी, जेणेकरून नागरिकांना स्थलांतरासाठी पुरेसा वेळ मिळेल.” अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाची भूमिका कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.