पुणे, 9 मे (हिं.स.)। पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत सन २०१९ नंतर कोणतेही काम झाले नाही. हवेली तालुक्यात रेल्वेसाठी भूसंपादन करताना दोन ते अडीच लाख रुपये गुंठे बाजारभाव असलेल्या जमिनी ३५ लाख रुपये गुंठे या दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून, राज्य शासनाने चौकशी करावी, अशी मागणी म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे ) झालेल्या पत्रकार परिषदेत आढळराव पाटील बोलत होते. यावेळी अरुण गिरे, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले व स्वप्नील बेंडे उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, ‘‘रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या सहा वर्षात चाकण ते नाशिक फाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही कायम आहे. इतरही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मंचर नगरपंचायतीने सर्व कामांची टेंडर ई-निविदा पद्धतीने पारदर्शकपणे राबविले आहे. एका ठेकेदाराकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती, ती मागणी मान्य न झाल्याने एका तथाकथित पुढाऱ्याने नगरपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चुकीचा व दिशाभूल करणारा आहे