सोलापूर, 14 जून (हिं.स.)। आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रोजी विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयास भेट दिली. यावेळी दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुक्यातील आरोग्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती केली. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते.
सांगोला शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक अधिकारी कर्मचार्यांची भरती करावी. लवकरात लवकर हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात यावे. त्याचबरोबर सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयास 100 बेड उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. सांगोला तालुक्यात हलदहिवडी आणि खिलारवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून तयार आहेत. त्याठिकाणी आवश्यक अधिकारी कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत. जवळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, महूद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करावे. तसेच आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्या सांगोला तालुक्यातील रिक्त जागा तत्काळ भराव्यात, अशा मागण्या केल्या.