महेश हणमे
मुंबई / सोलापूर
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले,त्यातल्या त्यात औरंगजेबाची कबर ते कॉमेडियन कामरा प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली, असे असले तरी सोलापूरकरांच्या विविध मागण्यासाठी आणि प्रश्नांसाठी सोलापूरच्या कारभाऱ्यांनी म्हणजेच आमदारांनी विधानसभेमध्ये मैदान राखलं असं म्हणावे लागेल. मध्य विधानसभा मतदारसंघातील युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी पहिल्याच अधिवेशनात मैदान राखलं अन् मारलं..! अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
अधिवेशन आणि आमदारांचा सक्रिय सहभाग हा सर्वसामान्य जनतेसाठी फार उपयुक्त ठरला जातो. लक्षवेधी प्रश्नांतून मोठमोठ्या विकास योजना पूर्णत्वास आणण्यासाठी अधिवेशन हे महत्त्वाचे असते. संपूर्ण राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथील विधान भवनात नुकतेच पार पडले. राज्यातील अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील समस्या, विकास योजना बाबत प्रश्न सभागृहात उपस्थित केले. हम भी कुछ कम नही..!. या आवेशात सोलापूरच्या कारभाऱ्यांनी विधानसभा गाजवली म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शहरी भागातून भाजपाचे युवा आमदार देवेंद्र कोठे चर्चेतला चेहरा ठरले आहेत. शहर मध्य मतदार संघातील अनेक महत्वपूर्ण प्रश्नाबाबत त्यांनी आवाज उठवला त्याच सोबत शहरातील अनेक समस्या, विकास योजना याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
देव यज्ञ जनता दरबाराच्या माध्यमातून जनसामान्यात मिसळणारा,सहज शिफारस पत्र देणारा, अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून सूचना देणारा युवा आमदार अशी छबी निर्माण करण्यात देवेंद्र दादा यशस्वी ठरले. आमदार आपल्या भेटीला या संकल्पनेतून मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे जिल्ह्यात कोठे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
देवेंद्र कोठे यांचे हे पहिलेच अधिवेशन होते. ग्रहण क्षमता तगडी असल्याने विषय पटकन समजून घेण्याची हातोटी कोठे यांच्याकडे आहे असे त्यांच्या संपर्कातील व्यक्ती सांगतात.
पाण्याचा दिवस हा शाप..!
सोलापूरकरांना चार-पाच दिवसाआड पाणी मिळते. पाण्याचा दिवस हा शब्दप्रयोग केवळ सोलापुरात लागू असेल. पाण्याचा दिवस हा शाप आहे असे सार्वजनिक ठिकाणी बोलून देवेंद्र कोठे यांनी नागरिकांची मने जिंकली. तेवढ्यावरच न थांबता विधानसभेत आणि बैठकांमधून पाणी प्रश्न ऐरणीवर आणला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार अशी प्रतिमा आ.कोठे यांची आहे. त्याचा उपयोग वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचे आदेश घेताना त्यांना झाला आहे.
पाणीदार नगरसेवक ते पाणीदार आमदार अशी उपमा त्यांना मिळत आहे. 1000 कोटी खर्च होऊन ही समांतर जलवाहिनी प्रकल्प रखडला गेल्याचे त्यांनी जाणले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अधिवेशन काळात उजनी धरणाच्या पाण्यासंदर्भात नियोजन बैठकीत त्यांनी काही प्रश्नांकडे लक्ष वेधले.
सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले. यामुळे सोलापुरातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थी आणि तरुण वर्गात यामुळे आशेचा किरण निर्माण झाला.
अधिवेशनात रात्री अकरा वाजता आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहर विकासाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. अभियांत्रिकी महाविद्यालय,टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याची मागणी केली. त्याच सोबत गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनाला आणले.
शहर परिसरात गणेश मूर्ती निर्माण करणारे जवळपास 18 हजार मूर्तिकार आहेत.पीओपी वरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय,त्यामुळे गणेश मूर्तिकारांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अमृत योजना, बंद अवस्थेत असलेल्या परिवहन विभागासाठी 100 इलेक्ट्रिक बस या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विधानसभेत आमदार कोठे यांनी केली.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी 25 जानेवारी रोजी जनता दरबार मध्ये आ.कोठे यांच्याकडे व्यथा मांडली होती. या प्रशिक्षणार्थींना पाच महिने मुदत वाढ मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनादरम्यान जाहीर केली.
जड वाहतुकीचा प्रश्न, जड वाहतुकीमुळे वाहनधारकांचा होणारा मृत्यू, केगाव,कासेगाव,दोड्डी, कुंभारी हत्तुर गाव
रिंग रोड, विमानतळाच्या नामकरणाची मागणी, सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्तांच्या घरकुलांचा प्रश्न, मतदार संघातील रेशन धान्याचा विषय, लाडक्या बहिणीचा मुद्दा, धार्मिक पर्यटन, या विषयावर रात्री साडेअकरा वाजता सोलापूरचा आमदार विधानसभेत बोलतोय हे सोलापूरकरांना नवे होते.
हताश झालेल्या उद्योजकांच्या चेहऱ्यावर आले हसू…
अनेक वर्षांपासून पेंडिंग असलेल्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रोड एमआयडीसीतील विकास कामांचा मार्ग आमदार कोठे यांनी उद्योग विभागांच्या सचिवांसोबत घेतलेल्या बैठकीमुळे मोकळा झाला.
एमआयडीसी भागात मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव होता. 1992 पासून हे विषय प्रलंबित होते. महापालिकेची आर्थिक क्षमता नसल्यामुळे मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक होते. थेट मुख्यमंत्र्यांनी आणि उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक शेरा मारल्यामुळे आणि उद्योग विभागाचे सचिव यांच्यासोबत बैठकीमुळे विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून हताश झालेल्या उद्योजकांच्या चेहऱ्यावर यामुळे हसू आले आहे
अधिवेशन काळातच अनेकांना वैद्यकीय सहाय्यता मदत
विधानसभा मतदारसंघातील अनेक गरजूंना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मोठा निधी मिळवून देण्याचे काम आमदार कोठे यांनी केले.
पहिल्याच अधिवेशनात आपल्या कामाचा आणि वक्तृत्वाचा ठसा उमटवण्यात युवा आमदार कोठे हे यशस्वी ठरले आहेत. अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात आणि नागरिकांमध्ये रंगली आहे.