सोलापूर / मोहोळ : अंघोळ करताना चोरून मोबाईलवर काढलेली चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ३० वर्षीय विवाहित युवतीवर आठ महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी एका इसमावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जैनुद्दीन लाला शेख (रा. सौंदणे ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील तांबोळे येथील एक विवाहिता अंघोळ करत असताना, जैनुद्दीन लाला शेख याने लपून मोबाईलमध्ये विडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्याने जानेवारी २०२० मध्ये सदरचा व्हीडीओ त्या विवाहितेला दाखवून तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने संभोग केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतरही त्याने वेळोवेळी विवाहितेस तिचा नवरा व लहान मुलाला जिवे मारण्याची धमकी देवून तब्बल आठ महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा नेहमीचा त्रास सहन न झाल्याने पिडीतेने बुधवारी (१९ ऑगस्ट) रोजी धाडस करुन मोहोळ पोलिसात धाव घेऊन आपली आपबिती कथन करुन फिर्याद दिली.

यात पीडितेने मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार जैनुद्दीन शेख याच्या विरोधात बलात्काराचा सह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे हे करीत आहेत.
