मोहोळ : २१ लाखाचे बक्षीस लागले असल्याचे अमीष दाखवून पोफळी ( ता. मोहोळ )येथील एका इसमाची ४ मार्च ते १२ डिसेंबर या कालावधीत ११ लाखांची फसवणूक झाली आहे, त्यांनी मोहोळ पोलिसाकडे धाव घेतल्याने एका अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंडित नाना कोळी (रा. पांडवाची पोफळी ता. मोहोळ) यांना ४ मार्च २०१९ रोजी ७३८७६६६२२० या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने कोळी यांना सांगितले की, तुमच्या नंबरवर २१ लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, तुम्हाला जर बक्षीस नको असेल तर इनोव्हा गाडी लागली आहे जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर सुरुवातीला केवळ १२ हजार ५०० रु भरा. त्यावेळी कोळी यांनी आम्हाला गाडी नको २१ लाख रुपये माझ्या खात्यावर पाठवा, असे सांगितले.
त्यावेळी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सदरचे २१ लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यावर पाठवू त्यापूर्वी तुम्ही आमच्या सरकारचा २ टक्के टॅक्स भरण्यास सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अज्ञात व्यक्तीने दिलेल्या ३८६६३३४८४६४ या बँक खाते क्रमांकावर त्यांनी फोन पे व गुगल पे वरून २१ हजार रुपये पाठवले. त्यानंतर सदरच्या अज्ञात व्यक्तीने तुमचा २१ लाख रुपयांचा चेक तयार केला आहे. मात्र बँक मॅनेजर ४ टक्के दिल्याशिवाय सही करणार नाही, असे सांगून कोळी यांच्याकडून आणखी ८६ हजार फोन पे व गुगल पे करून घेतले.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या कारणावरून कोळी हे पैसे भरत गेले. त्यानंतर कोळी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सोलापूर येथे जाऊन सायबर सेल येथे जाऊन तक्रारी अर्ज दिला व त्या अर्जाची प्रत त्या अज्ञात इसमाच्या व्हाट्सअप्प वर पाठवली. त्या इसमाने कोळी यांना परत एकदा फोन करत मी जर खोटा असेल तर तुम्ही मला येऊन घेऊन जाल, मी हे काम लीगल करत आहे. तुम्ही माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकता, असे सांगितल्याने कोळी यांचा त्या अज्ञात इसमाच्या सांगण्यावर विश्वास बसला.
दरम्यान ४ मार्च २०१९ ते १२ डिसेंबर २०२० पर्यंत सदरच्या अज्ञात व्यक्तीने कोळी यांच्याकडून तब्बल ११ लाख ३ हजार रुपये इतकी रक्कम गुगल पे व फोन पे वरून तीन वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेत पंडित नाना कोळी यांना टोपी घातली. याप्रकरणी कोळी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर करत आहेत.