नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.)। देशभरात मान्सूनने जवळपास सर्वच ठिकाणी जोर पकडला असून, हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर झारखंडसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, राजस्थानमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. झारखंड आणि बिहारमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले होते त्यामुळे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाला होता .
२१ राज्यांमध्ये यलो अलर्ट, ४ राज्यांत ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने आज (रविवारी) मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच, देशभरातील २१ राज्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य प्रदेशात ५ जिल्ह्यांत पूर, धरणाचे दरवाजे उघडले
मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे सतना, छतरपूर, खजुराहो, रेवा आणि चित्रकूट जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. खजुराहोमध्ये ९ तासांत तब्बल ६.३ मिमी , तर नौगाव (छतरपूर) येथे ३.४ मिमी पावसाची नोंद झाली. चित्रकूटमध्ये पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे वाचवण्यात आले.
राज्यातील बनसागर धरणाचे ७ दरवाजे आणि बर्गी धरणाचे ५ दरवाजे सुरक्षेच्या कारणास्तव उघडण्यात आले आहेत.
राजस्थानात पावसामुळे दुर्दैवी घटना, २ मुलांचा मृत्यू
काल शनिवारी झालावाड, धोलपूर, करौली आणि अलवर जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. झालावाडमध्ये ४ मिमीपेक्षा जास्त पावसामुळे सखल भागात पाणी साचले. याच दरम्यान, पाण्यात बुडून ३ मुले वाहून गेली, त्यापैकी २ च्या मृतदेहांचा शोध लागला असून, एकाचा शोध सुरू आहे.
झारखंड व बिहारमध्ये वीज कोसळून ३ मृत्यू
झारखंडमधील सरायकेला-खरसावन आणि लोहारडगा जिल्ह्यांत वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण भाजला. हे तिघे शेतात काम करून घरी परतत असताना ही घटना घडली.
बिहारमधील रोहतास जिल्ह्यात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. हवामान खात्याने या भागात अजूनही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हिमाचल प्रदेशात भूस्खलन, शेकडो वाहने अडकली
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात पांडोह धरणाजवळ ‘कैंची मोर’ येथे भूस्खलन झाल्याने चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे शेकडो वाहने रस्त्यावर अडकली आहेत. राज्यातील २५० पेक्षा अधिक रस्ते दहा तासांसाठी बंद करण्यात आले होते.
दिल्लीसह अनेक राज्यांत यलो व ऑरेंज अलर्ट
दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेने शनिवारी संध्याकाळी १२.९ मिमी पावसाची नोंद केली. शहरात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसामुळे हवामानात गारवा जाणवला. रविवारी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
उत्तराखंडमध्ये वीज कोसळण्याबरोबरच पूर आणि भूस्खलनाचा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरात मान्सूनचा विस्तार होत आहे ,आयएमडी ने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यांनी असेही नमूद केले की, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओडिशा या पूर्व भारतातील भागांतही पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची स्थिती कायम राहील.
