अमरावती, 19 मे, (हिं.स.) बडनेरा रेल्वे स्थानक येथून आईसह चार वर्षाची लहान मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली असून अमरावतीसह नागपूर पोलीस महिलेच्या शोधात आहेत.
पूजा राहूल बेले (वय २२ रा. मोहाड. ता. नरखेड) व चार वर्षाची बालिका अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.पूजाचे पती राहुल बेले यांनी पत्नी व लहान मुलीला ९ मे रोजी वरुड रेल्वे स्थानक येथून बडनेरा नरखेड गाडीत बसून दिले होते. दुपारी ३.३० च्या सुमारास पत्नी व मुलगी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचल्यावर पत्नीने पतीला फोन करून बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचल्याचे सांगितले त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. पती राहूलने तिला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल बंद येत होता.
दुसऱ्या दिवशी सुध्दा पत्नीचा मोबाईल बंद येत असल्यामुळे पती व कुटूंबातील सदस्य घाबरले.दरम्यान ११ मे रोजी ४ वाजताच्या सुमारास पत्नीने पतीला फोन केला आणि घरगुती सामान घेऊन अमरावतीला बोलाविले. त्यानंतर काही वेळाने पतीने पत्नीला फोन केला असता बंद आला.त्यामुळे त्यांनी सतत तिला फोन केला.परंतु मोबाईल बंद येत असल्यामळे पत्नी व लहान मुलगी कुठे आहे,
त्याच्यासोबत काही वाईट तर झाले नाही ना असे अनेक विचार पतीच्या मनात फिरत होते. त्यामुळे त्यांनी १५ मे रोजी नरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन शोध सुरू केला. तसेच रेल्वे पोलीस व अन्य जिल्ह्याच्या पोलीस ठाण्याला ही माहिती दिली असून अमरावती पोलीससुध्दा महिलेसह मुलीच्या शोधात आहेत.
