मुंबई, 15 जुलै (हिं.स.)।जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आज(दि.१५) भारतात एंट्री केली आहे. जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कार बाजारात टेस्लाने आपले पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आजपासून सुरू केले आहे. मुंबईत ४ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेले टेस्लाचे पहिले शोरूम तयार झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यासाठी चीनमध्ये तयार झालेल्या गाड्यांचा पहिला साठा (सुमारे ५ कार) भारतात दाखल झाला आहे. या शोरूमच्या उद्घाटनासोबतच टेस्ला दक्षिण आशियाई बाजारात अधिकृतपणे प्रवेश करेल. या शोरूमला ‘एक्सपीरियन्स सेंटर’ म्हणूनही पाहिले जात आहे,
जिथे भारतीय ग्राहक पहिल्यांदाच टेस्लाच्या कार जवळून पाहू शकतील. मुंबईनंतर टेस्लाचे पुढील शोरूम देशाची राजधानी दिल्लीत उघडले जाईल. लॉन्चपूर्वी यावर निश्चितपणे काहीही सांगणे कठीण असले तरी, यावर्षी मार्च महिन्यात टेस्लाने आपल्या दोन कार मॉडेल Y आणि मॉडेल 3 यांच्यासाठी होमोलोगेशन अर्ज दाखल केले होते. भारतात नवीन कार लॉन्च करण्यापूर्वी होमोलोगेशन ही एक अंतिम आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया भारतात तयार होणाऱ्या, असेंबल होणाऱ्या किंवा थेट आयात होणाऱ्या (CBU) सर्व गाड्यांना लागू होते. कंपनी सुरुवातीला आपली ‘मॉडेल Y’ बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. मॉडेल Y ही एक शक्तिशाली बॅटरी पॅक असलेली मिड-साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.
जागतिक मॉडेलनुसार, ही कार एका चार्जमध्ये ५७४ किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. याशिवाय टेस्ला आपली मॉडेल 3 आणि मॉडेल X (Model X) देखील भारतीय बाजारात आणू शकते, पण मॉडेल X ची किंमत खूप जास्त असेल. भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार, टेस्लाच्या कार भारतात खूप महाग असू शकतात. भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्लाच्या गाड्यांवर सुमारे ७० टक्के आयात शुल्क लागेल. त्यामुळे, भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत अंदाजे ६० ते ६५ लाख रुपये असू शकते. सुरुवातीला टेस्ला आयात केलेल्या कार भारतात विकणार असली तरी, येथील बाजारपेठेतील मागणीनुसार कंपनी भविष्यात आपल्या धोरणात बदल करू शकते. अशीही चर्चा आहे की, कंपनी भारतासारख्या बाजारपेठेसाठी एका किफायतशीर मॉडेलवर काम करत आहे.