पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर असं दोन दिवसांचंच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचं अधिवेशन आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलंय.
नाना पटोले आज पंढरपूरमध्ये होते. नाना पटोले हे आज पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कोरोना महामारीमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असून ते 14 आणि 15 डिसेंबरला होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावर भाजपसह विधानसभा अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अधिवेशनाचा वेळ कमी केल्याचं आपल्याला मान्य नसल्याचं नाना पटोले म्हणालेत. विधानसभेचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं पार पडावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज करता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.
“अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हे लोकशाहीला धरुन असल्याचं मान्य करता येणार नाही. कोरोनामुळे सभागृहात गर्दी होऊ नये यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा निश्चित केला असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदारांना आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य अधिवेशनात आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. कालावधी कमी असल्यानं आमदारांवरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करणं लोकशाहीला पोषक नाही”, असंही म्हणाले.
* पंढरपुरातील संचारबंदीची चौकशी करु
पंढरपूर हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आहे. पंढरपूरच्या विकासासंदर्भात लवकरच माझ्या दालनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेणार आहे. तसंच पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त लावण्यात आलेल्या संचारबंदीबाबत आपण माहिती घेऊ. चुकीच्या पद्धतीनं संचारबंदी लागू केली असेल तर चौकशी करण्याचं आश्वासनही पटोले यांनी दिलं आहे.