नांदेड, २४ ऑगस्ट: भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार निधीतून २० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील हसनाळ आणि रावणगाव गावांना भेट देताना त्यांनी ही घोषणा केली.
गोपछडे यांनी सांगितले, “अतिवृष्टीमुळे येथे पाच जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जनावरे बळी गेली आहेत. लाखो हेक्टर पिके नष्ट झाली आहेत.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन दिले.
या मदतीशिवाय, राज्य आणि केंद्र सरकारकडूनही अतिरिक्त मदत मिळविण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.