मुंबई, 10 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल भातखळकर, आ. संजय कुटे, आ. सीमा हीरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील जनहिताच्या योजनांची संपूर्ण तपशीलवार माहितीच सादर केली. याच काळात देशातील विविध विकास योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासास गती मिळाली असून महाराष्ट्र मोदी सरकारचा आभारी आहे, असे ते म्हणाले. राज्यात रेल्वेचे पावणेदोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत, असे सांगून ते म्हणाले की, युपीए सरकारच्या काळात दहा वर्षांत राज्याला रेल्वेकरिता मिळाले होते त्याहूनही अधिक निधी मोदी सरकारने एका वर्षात दिला. मोदी सरकारच्या सहकार्यातून राज्यात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटींची कामे सुरू आहेत. एकाच वर्षात राज्यातील गरीब लाभार्थींकरिता 30 लाख घरे मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थींची सर्व यादी पूर्ण झाली असून नवी यादी तयार करण्याचे केंद्राने सुचविले आहे.
‘प्रत्येकाला घर’ हा मोदी सरकारचा संकल्प आहे. गरीब कल्याणाचा ध्यास घेऊन देशात मोदींनी विविध योजना राबविल्या. कोविडच्या काळापासून देशातील 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले, 12 कोटी शौचालये झाली, मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया अंतर्गत अनुसूचित जातिजमातींच्या लाभार्थींना 14 हजार 700 कोटींचे कर्ज देऊन आत्मनिर्भरतेचा आधार दिल्यामुळे या वर्गाचे जीवनमान उंचावले आहे. मोदी सरकारच्या काळात 55 कोटी जनधन खाती उघडली गेली, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा 51 कोटी लोकांना लाभ मिळाला, आयुष्मान भारत योजनेत 77 कोटी खाती नोंदविली गेली असून यातून कोट्यवधी गरीबांना मोफत आरोग्य सेवा मिळत आहेत. मोदी सरकाने आतापर्यंत थेट खात्यात दिलेल्या एकत्रित लाभांची किंमत 42 लाख कोटींची आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
मोदी पर्वात लाखो घरांचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून सामान्यांची घरे विजेने उजळली आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करून गरीब कल्याणाच्या मोदी सरकारच्या अनेक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. मोदी यांच्या नेृत्वाखालील केंद्र सरकारला सर्वसमावेशक चेहरा असून 60 टक्के मंत्री अनुसीचित जाततीजमातींचे आहेत. मोदी सरकारच्या योजनांचे 80 टक्के, तर प्रधानमंत्री आवास योजनेत 45 टक्के, विविध शिष्यवृत्त्यांचे 58 टक्के, मुद्रा योजनेतील 51 टक्के लाभार्थी अनुसूचित जातीजमातीचे आहेत, असे ते म्हणाले. समाजातील वंचित लोकांना थेट लाभ दिल्यामुळेच 25 कोटी लोकसंख्या गरीबी रेषेच्या वर आली. गेल्या दहा वर्षांत शेती क्षेत्रात पाच पटींनी वाढ झाली. पीएम किसान योजनेअंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये आतापर्यंत दिले गेले आहेत. युपीए सरकारने 80 हजार कोटींच्या कर्जमाफीचा डांगोरा पिटला, तर मोदी सरकारने 3.7 लाख कोटी रुपये दिले. प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत विमा दावे निकाली काढून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा दिला आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या अकरा वर्षांत पिकांच्या हमीभावात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादनात जवळपास 80 टक्के वाढ झाली आहे, मत्स्योत्पादन वाढले आहे, इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये 38 कोटी लिटर वरून 44 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली असून त्यामुळे एक लाख कोटींचे परकीय चलन वाचले, त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा मिळाला, असेही ते म्हणाले.