वॉशिंग्टन, 11 सप्टेंबर।चीन आणि अमेरिकेमधील टॅरिफबाबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नासाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नासाने वैध नागरिक व्हिसा असलेल्या चिनी नागरिकांना आपल्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध घातला आहे. आता चिनी नागरिक कोणत्याही स्वरूपात नासामध्ये काम करू शकणार नाहीत. हा निर्णय अध्यक्ष ट्रम्प यांच्या चीनविरोधी वाढत्या वक्तव्यांमुळे घेतला गेला असल्याचं सांगितलं जात आहे.
नासाच्या प्रेस सचिव बेथनी स्टीव्हन्स यांनी सांगितले की, नासाने चिनी नागरिकांबाबत अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये आमच्या कामाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आमच्या सुविधा, साहित्य आणि नेटवर्कवरील भौतिक आणि सायबर प्रवेश मर्यादित करण्याचा समावेश आहे.
याआधी चिनी नागरिकांना कंत्राटदार किंवा संशोधनात योगदान देणारे विद्यार्थी म्हणून काम करण्याची परवानगी होती, जरी त्यांना कर्मचारी म्हणून काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र आता त्यांना अचानक आयटी सिस्टममधून वगळण्यात आले आहे. त्यांना बैठकींमध्ये सहभागी होण्यापासूनही रोखण्यात आले आहे. अमेरिका आणि चीन चंद्रावर आपली मोहीम पाठवण्यासाठी स्पर्धेत आहेत. नासा आपल्या आर्टेमिस कार्यक्रमाअंतर्गत 2027 पर्यंत अंतराळवीरांचा चमू चंद्रावर पाठवू इच्छितो. मात्र, या मोहिमेच्या खर्चात वाढ झाली आहे आणि वेळेत उशीरही होत आहे. दुसरीकडे, चीन आपले टायकोनॉट्स 2030 पर्यंत चंद्रावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे आणि त्याचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे.
अलीकडेच नासाचे कार्यवाहक प्रमुख सीन डफी यांनी म्हटले होते की, “आपण सध्या दुसऱ्या अंतराळ शर्यतीत आहोत. चीन आमच्यापूर्वी चंद्रावर परत जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण असे होणार नाही. अमेरिकेने पूर्वी अंतराळात नेतृत्व केले आहे आणि भविष्यातही नेतृत्व करत राहील.”
ट्रंप प्रशासनाने आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावाद्वारे युरोपियन स्पेस एजन्सीबरोबरची संयुक्त प्रकल्प – मंगळ ग्रहावरून नमुने परत आणण्याची मोहीम – रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.चीन मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरून नमुना आणणारा पहिला देश बनण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो 2028 मध्ये एक रोबोटिक मोहीम सुरू करणार असून 2031 पर्यंत तेथून खडक परत आणण्याचे लक्ष्य आहे.
