नाशिक, 17 सप्टेंबर। कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव करून कांद्याला ३,००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावामध्ये कांदा पिकासाठी प्रतिक्विंटल हमीभाव ₹३,००० तसेच यापूर्वी विकल्या गेलेल्या कांद्याला ₹१,५०० प्रतिक्विंटल अनुदान देण्याची ठाम मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी केंद्र शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने देऊन पोकळ हवालदारगिरी चालू ठेवू नये. केंद्र शासनाने त्वरित हमीभाव ₹३,००० प्रतिक्विंटल जाहीर करून मागील कांद्यासाठी ₹१,५०० प्रतिक्विंटल अनुदान दिले नाही, तर राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आंदोलनाचा निर्णय घेतील.
तालुक्यातील जोगलटेंभी येथील ग्रामपंचायतीतही असाच ठराव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे आणि कांदा सध्या कवडीमोल दरात विकला जात आहे असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.