नवी मुंबई, २१ ऑगस्ट: नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला अनुसरून शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा ज्ञानदीप प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडली. यामध्ये इयत्ता तिसरी ते सातवीच्या १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वत:च्या हातांनी सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. चित्रकला शिक्षिका प्राजक्ता गर्जे आणि रेश्मा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली लहान विद्यार्थ्यांनी उत्साहात हा उपक्रम पूर्ण केला. शाळेच्या मुख्याध्यापक बंकट तांडेल यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले होते.
नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छता अधिकारी विजय नाईक यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा शक्य झाली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यापूर्वीच नागरिकांना पर्यावरणास अनुकूल आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.