नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय गटाची बैठक मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) पार पडली. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील एक ठरावही एनडीए खासदारांकडून मंजूर करण्यात आला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचा विशेष सत्कार केला. संपूर्ण हॉलमध्ये “भारत माता की जय”च्या घोषणा आणि टाळ्यांच्या कडकडाटाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
संसदेच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी खासदारांना संबोधित करणार होते. ही बैठक संसदेमध्ये बिहारच्या मतदार यादीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाली. विरोधकांच्या सातत्याने चालू असलेल्या आंदोलनामुळे दोन्ही सभागृहात गोंधळाचे वातावरण आहे.
एनडीएची ही बैठक चालू संसदीय अधिवेशनातील पहिली बैठक होती. सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात झालेल्या आक्रमक चर्चेनंतर पंतप्रधानांचा हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.