काठमांडू, 9 सप्टेंबर : नेपाळमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलनकर्ते सुरुवातीपासूनच पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र, ओली सरकारमधील एका मंत्र्याने सांगितले होते की पंतप्रधान ओली राजीनामा देणार नाहीत. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर काठमांडूमध्ये आंदोलन अधिकच तीव्र झाले आणि निदर्शकांनी राष्ट्रपती भवनापासून ते पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानापर्यंत जाळपोळ केली. लष्करदेखील या आंदोलनकर्त्यांना रोखण्यात अपयशी ठरत होते. निदर्शकांनी लष्कराच्या जवानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती.
तरुणांच्या आंदोलनाचा व्याप वाढत चालल्यामुळे पंतप्रधान ओली यांच्यावर सतत राजीनाम्याचा दबाव येत होता. यावेळी लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी केपी शर्मा यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच परिस्थिती सुधारेल असे ते म्हटले होते. तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सरकारविरोधात आंदोलन करणारे तरुण आज, मंगळवार सकाळपासूनच सध्याच्या सरकारऐवजी अंतरिम सरकार स्थापण्याची मागणी करत होते. बीरगंजमध्येही आंदोलकांनी हिंसाचार व जाळपोळ केली आहे.
पंतप्रधान के.पी. ओली यांच्या आधी त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ओली सरकारमधील गृहमंत्र्यांनी सोमवारीच राजीनामा दिला होता. आतापर्यंत ४ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये गृहमंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांचा समावेश आहे.भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात देशात सलग दुसऱ्या दिवशीही तरुणांचे निदर्शने सुरू आहेत. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, मृतांच्या नातेवाइकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसेच आम्ही प्रार्थना करतो की ईश्वर जखमींना लवकरात लवकर बरे करील. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले की, नेपाळचा शेजारी देश म्हणून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्हाला आशा आहे की नेपाळमध्ये लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि जर कुठल्याही गोष्टीवरून कोणामध्ये मतभेद असतील, तर संवादाद्वारे त्याचे समाधान निघावे.