सोलापूर, 11 जून (हिं.स.)।
विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद आणि सुलभपणे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर आता दर्शन बारीला जाळी गार्ड बसविण्यात आले आहे. यामुळे वारीकाळात दर्शन बारीत होणाऱ्या घुसखोरीला आळा बसणार आहे.आषाढी यात्रेचा सोहळा तोंडावर आला आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
सध्या दररोज एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत. त्यामुळे दर्शनाची रांग पत्राशेडपर्यंत गेली आहे. येणाऱ्या भाविकांना जलदगतीने आणि सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने दोनच दिवसांपूर्वी दररोज होणाऱ्या ८० तुळशी पूजा कमी करून त्या फक्त दहा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अवधी किमान एक तासाने कमी झाला आहे.