माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप
सिंधुदुर्ग, 19 एप्रिल (हिं.स.)। माझ्यावर आरोप करणारे आमदार निलेश राणे हेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे ‘आका’ आहेत. वाळूच्या एका डंपर मागे ते तीन हजार रूपयांची वसूली करत आहेत असा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज केला.
गृहखाते तुमच्याकडे आहे, पालकमंत्री तुमचे बंधु आहेत, तुमचे वडील खासदार आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा मला पोलीस स्टेशनला घ्या आणि माझ्यावर कोणकोणते गुन्हे आहेत त्याची एकदा चौकशी करा, असे थेट आव्हानही श्री.नाईक यांनी दिले.
कणकवली येथील आपल्या विजय भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना कणकवली विधानसभा संघटक सतीश सावंत होते.
नाईक म्हणाले, आमदार निलेश राणे हे बिडवलकर खून प्रकरणी माझ्यावर सातत्याने आरोप करत आहेत. पण गेल्या चार दिवसांत ते एकही पुरावा देऊ शकलेले नाहीत. यापूर्वी त्यांचे काका अंकुश राणे खून प्रकरण, राजकोट येथील शिवपुतळा कोसळणे आदी प्रकरणांतही त्यांनी माझ्यावर असेच खोटे आरोप केले होते.
श्री.नाईक म्हणाले, माझ्यावर आरोप करणाऱ्या राणेंनी आधी स्वत:ची कौटुंबिक, राजकीय स्थिती तपासायला हवी. राज्याचे आत्ताचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी किती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, त्याचे दाखलेच विधीमंडळात दिले होते. आमदार नीलेश राणे हे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे आका तथा आश्रयदाते झाले आहेत. प्रत्येक वाळूच्या डंपरकडून त्यांचे कार्यकर्ते तीन हजाराचा हप्ता घेत आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत. बिडवलकर खून प्रकरणातील सिद्धेश शिरसाट याच्या अनेक उपक्रमांना निलेश राणे यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच शिरसाट याच्या पैशातून राणे यांनी अनेक उपक्रम पार पाडले आहेत. शिरसाट यांना आशीर्वाद देत असल्याचीही छायाचित्रे निलेश राणे यांच्या सोशलमिडिया अकाऊंटवर आहेत. त्यामुळे कोण कुणाचे पाठीराखे हे येथील जनता ओळखून आहे. नाईक म्हणाले, बिडवलकर खून प्रकरण हे निलेश राणे यांना माहिती होते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजनच्या सभेत त्यांनी पोलीस अधीक्षकांना दोन वर्षे जूनी प्रकरण का काढता अशी विचारणा केली होती. दोन वर्षापूर्वीची जुने प्रकरण काय होते ते आता सर्वांसमोर आलं आहे.