मुंबई : भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जिव्हारी लागणारी टीका केली आहे. राणे कुटुंब आणि राज ठाकरे यांच्यात कौटुंबिक संबंध असूनही, अलीकडे नितेश राणे हे राज ठाकरेंवर सतत निशाणा साधताना दिसत आहेत.
“राज ठाकरे यांच्या सभेनंतर प्रश्न उपस्थित”
“राज ठाकरे यांची काल सभा झाली. ते अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात. पण अशा सभा आणि वोट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत?” असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, “कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. वाढवणच्या बंदरामुळे तब्बल 12 लाख तरुणांना थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. मग कुठल्या हिशोबाने वाढवण प्रकल्प वाईट आहे?”
“राज ठाकरे चुकीच्या माहितीच्या नादाला लागले”
“हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहेत? चुकीची माहिती राज ठाकरेंना दिलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे 1950 मध्ये वारले, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1956 मध्ये झाली. चांगल्या प्रकल्पाला विरोध कुणीच करू नये. अदानींचे फोटो मातोश्रीवर आहेत. आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे, तर मालेगाव, बहरमपाडा, नळ बाजारमध्ये कधी जाणार?” असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
“अबू आझमींच्या कानाखाली का खेचली नाही?”
“अबू आझमींच्या कानाखाली का खेचली नाही? मानखुर्द-शिवाजीनगरमधील बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. पण मविआच्या नादाला लागून आम्हालाच टार्गेट केलं जातं आहे,” असंही राणे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की, “संजय राऊत हे अर्बन नक्षलची भाषा करत आहेत.”
“मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासा”
राज ठाकरे यांच्या मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “राज साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये; ते वाया गेलेले मतदार आहेत. उद्या हाजीअलीला जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का? वातावरण कोण खराब करतंय? नमाज पढण्यासाठी मशिदी कमी पडत आहेत. मोर्चे मोहल्यावर काढा आधी.” तसेच त्यांनी सुचवलं, “राज ठाकरेंनी सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्यात.”
“उबाठाकडे उमेदवार नाहीत”
महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीबद्दल बोलताना राणे म्हणाले, “मैत्रीपूर्ण लढत असेल तर त्याचा फायदा महायुतीलाच होईल. वेगळं लढायचं आणि नंतर युती करायची ही नीती आम्ही पाळत नाही. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाकडे उमेदवारच नाहीत.”