पाटणा, 23 जुलै – बिहारमध्ये एसआयआर (विशेष सघन सुधारणा) मोहिमेवरून राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात बिहार विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी एसआयआरविरोधात आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विधानसभेत वादाचे सत्र
विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना थेट उद्देशून म्हटले,
“आधी तुम्ही सरकारमध्ये होता, मग आता टीका का करता? तुमचे वडील आणि आई दोघंही मंत्री होते, आई तर मुख्यमंत्रीही होत्या. त्या काळात परिस्थिती कशी होती हे सर्वांना माहिती आहे. आम्ही गेली २० वर्षे काम करत आहोत. आज केवळ तिसरा दिवस आहे, पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि आम्ही भरपूर काम सुरू केले आहे.”
ते पुढे म्हणाले,
“तुम्ही लहान आहात, त्यामुळे काही गोष्टींची जाणीव नाही. आम्ही जेव्हा एकत्र होतो, तेव्हा तुम्ही आमचं कौतुक करत होता. पण नंतर काम नीट केलं नाही, म्हणून तुम्ही आमच्यापासून वेगळे झाला. आता पुन्हा निवडणुकीत जा आणि लोकांचं मत मिळवून दाखवा. लोक ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतील, तोच सत्तेत येईल.”
मतदार यादीविषयी मौन
एसआयआर मोहिमेचा मुख्य मुद्दा असलेल्या मतदार यादीसंदर्भात मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत थेट उत्तर दिलं नाही. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.