नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : उत्तर भारतातील मुसळधार पावसामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर असून २३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार गावे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. ३ लाख ८४ हजार लोकसंख्या बाधित झाली असून आतापर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १२ दिवसांनंतर आज राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, मात्र पूरग्रस्त भागातील शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. भाक्रा नांगल आणि पोंग धरणातील पाण्याची पातळी काहीशी कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी धोका अद्याप कायम आहे.
राजस्थानातील उदयपूर, सालुंबर, जालोर, डुंगरपूर, सिरोही, बारमेर, जैसलमेर आणि बालोत्रा या आठ जिल्ह्यांमध्ये नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिलवाडा येथे पावसाच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याने झाडावर चढून जीव वाचवला.
हथिनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुनेचे पाणी शहरात घुसले आहे. वृंदावनमधील राधा वल्लभ मंदिर परिसर जलमय झाला असून बांके बिहारी मंदिरापासून अवघ्या १०० मीटरवर पूराचे पाणी वाहत आहे. शहरातील अनेक भागांत तीन फूट पाणी साचले असून नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. राम घाट आणि श्याम घाट परिसरातील बाजारपेठाही पाण्याखाली गेली आहे.
हिमाचल प्रदेशातही परिस्थिती गंभीर असून दोन राष्ट्रीय महामार्गांसह ८२४ रस्ते अद्याप बंद आहेत. यापैकी अनेक रस्ते दहा दिवसांपासून ठप्प आहेत. राज्यात या हंगामात सरासरीपेक्षा तब्बल ४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. १ जून ते ७ सप्टेंबरदरम्यान ६५२.१ मिमी सरासरी पावसाऐवजी यंदा ९४८.५ मिमी पाऊस पडला आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचे प्रमाण वाढले असून वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.
सततच्या पावसामुळे आणि वाढत्या पुरामुळे उत्तर भारतातील लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.